Saturday, December 26, 2015

माझेच मला आवडलेले या वर्षीचे (सन २०१५) फोटो

माझी फोटोग्राफी ची सुरवात फार आधीची. जेंव्हा मी पहिला फिल्म पॉईंट अँड शूट कॅमेरा घेतला तेंव्हा. आता आठवत नाही कधी घेतला होता तो. बहुदा १९९५ किंवा १९९६ मधे घेतला असावा. पगार कमी. बाकीच्या खर्चातून पैसे वाचवत घेतलेला. महाग असलेले फिल्मचे ते रोल. काहीच नसलेली माहिती. ISO 100, ISO 200 व ISO 400 असं काही तरी त्यावर लिहिलेलं थोडं थोडं आठवतंय. यातील नेमके कोणत्या प्रकारचे रोल घेतले ते मात्र आता आठवत नाहीत. फिल्म रोल कॅमेरात टाकणे ( बसवणे वगैरे नाही... टाकणे) आणि कशाचेही फोटो काढणे. काहीही माहिती नसताना आणि कुणालाही विचारायच्या भानगडीत न पडता तो त्यावेळी केलेला प्रचंड खर्च. फिल्म रोल खरेदी करून फोटो काढणे इतपत शक्य झालं, पण रोल डेव्हलप करून प्रिंट्सचा खर्च मात्र पेलवण्याजोगा नव्हताच. मग शक्य तितक्या प्रिंट काढून घेतलेलं तेवढं आठवतंय. त्या प्रिंट कुठे गेल्या कोण जाणे.
आधलं-मधलं पुन्हा केंव्हा तरी...नोव्हेंबर २०१३ च्या ब्लॅक फ्रायडे च्या एक दिवस आधी उदय ताकभातेंचा रात्री झोपेत असताना कॅनडावरून फोन आला. त्याने सांगितलं की निकॉन D5200 वर खूप छान ऑफर आहे. फक्त ₹५४०००/- . खाड्कण जागा झालो. झोप कुठच्याकुठे पळून गेली. उठून बसलो. कारणच तसं होतं. तोच कॅमेरा भारतात खूप महाग होता. पण पैशांची व्यवस्था अजिबात नव्हती. त्याला दुसऱ्या दिवशी इथे चौकशी करून सांगतो असं म्हणालो. रात्री झोपलोच नाही. रात्रभर ऑनलाईन किमती बघत होतो. दुकानात चौकशी ला जायचं राहून गेलं. रात्री परत त्याचा फोन आल्यावर घे म्हणून सांगितलं पण पैसे नंतर तीन चार महिन्यांनी पाठवणार. लगेच द्यायला नव्हतेच. त्याने खरेदी केलाच होता. आधीच त्याच्याबरोबर या कॅमेरासंबधी बोललोच होतो. मी जर घेतला नसता तर उदयने तो कॅमेरा स्वतः साठी ठेवला असता. झालं, मी लगेच हवेत. स्वप्न बघायला लागलो. असे फोटो काढायचे आणि तसे सुद्धा. आपण तरी चांगलेच फोटो काढायचे. पैशांची व्यवस्था कशी करायची? हा मोठा प्रश्नच होता. इकडे कॅमेरा कुणी घेऊन येणारा मिळेना. जानेवारीत पैशांची व्यवस्था करून त्याला दिले. आणि मार्च २०१४ मधे कॅमेरा हातात पडला.
स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान म्हणतात ते काय असतं, त्याचा प्रत्येय आला. कॅमेरात कार्ड नव्हतं. लगेच १६जी बी चं कार्ड खरेदी केलं. त्या आधी ऑनलाइन बऱ्याच गोष्टी वाचून घेतल्या होत्या. इतका मोठा आणि जड कॅमेरा, मी दहा वर्षांचा होतो तेंव्हा मामाच्या मित्राचा तसला फिल्म कॅमेरा हातात घेऊन पाहिला होता. त्यानंतर आता, तोही स्वतःचा. घरात गेल्याबरोबर लगेच फोटोग्राफी सुरु. थोडावेळ ऑटो मोड वर. नंतर मग मॅन्युअल मोड वर. त्यारात्री कसली झोप आणि कसलं काय! पहाटे थकून गेल्यावर झोपलो आणि उशीराच उठलो. ऑफिसला जायला खूपच उशीर झाला. जाताना गुंगीत असल्यासारखाच गेलो. सगळ्यांनी पार्टीची मागणी केली. पार्टी म्हणजे वडापाव किंवा पॅटीस. देणं भागच होतं.
खरंतर मला २०१४ मध्ये फारशी फोटोग्राफी करायला मिळालीच नाही. ते वर्ष कॅमेरातील सेटिंग शिकण्यातच गेलं. त्यात एका मोठया बंगल्याचं इंटिरियरचं काम सुरु होतं त्यामुळे वेळही मिळत नव्हता. ते काम यावर्षीच्या म्हणजे २०१५ च्या जानेवारीत संपलं. मी ऑफिसमधून रीतसर सुट्टी घेतली. छोटी नक्कीच नाही. आठ महिन्यानंतर पुन्हा कामाला सुरवात केली. या आठ महिन्यातील पहिले तीन महिने ऑनलाइन गाईडन्स वाचून, प्रयत्न करत फोटोग्राफी शिकून घेतली. जानेवारीपासून बाहेर फोटो काढायला जाणं सूरू झालं. मागच्या दिवाळीत जी काही पुणे-कोल्हापूर-पुणे या बाईकवरील ट्रिप मध्ये फोटोग्राफी केली तेवढीच. तेंव्हा फारसं त्यातील ज्ञान नव्हतेच. जानेवारी ते मार्च या महिन्यांत फक्त फोटोग्राफी, फोटोग्राफी आणि फक्त फोटोग्राफी. वाचन आणि प्रॅक्टिस, इतकंच.
मार्चनंतर मी बाहेर फिरणं वाढवलं. घराजवळील ठिकाणे शोधून मी आणि सत्या जात होतो. अजूनही जातोय. लांबची ठिकाणं आत्तापर्यंत दोनच झालेत. एक भिगवण आणि दुसरं वीर डॅम. वीर डॅम च्या व्हिजिट बद्दल लिहायचंय. या दोन्ही ठिकाणी आम्ही म्हणजे Shutterbugs चा ग्रुप व्हिजिट करून आला. पुन्हा जायचंय. पुन्हा अनुभवायचंय. अजूनही या जिल्ह्यातच फिरतोय. या जिल्ह्यातील जास्तीतजास्त ठिकाणं कॅमेराबंद करायची आहेत.
यावर्षी माझ्या दृष्टीने मी काढलेले व मलाच आवडलेले काही फोटो मी इथे तुमच्याबरोबर शेयर करतोय. बहुदा तुम्हाला देखील आवडतील, असं गृहीत धरून चालतोय. कदाचित यातील काही ठिकाणे, पक्षी, किंवा फुले तुम्ही पाहिलीही असतील. काही नक्कीच तुमच्यासाठी नवीन असतील. मी त्या स्थळांची थोडक्यात माहिती देतोय. पक्षी, प्राणी किंवा फुले यांच्याबद्दल मी काही लिहू शकणार नाही. तेवढा माझा अभ्यासदेखील नाही. आवडल्यास नक्की कळवा आणि इतरांना ही सांगा.
हा आहे वाकडच्या म्हातोबा मंदिराजवळील 
वाकड आणि बानेरला जोडणारा पूल. इथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. इथे पावसाळा संपला की पाणी अडवलं जातं. पण स्वच्छता नसल्याने त्यावर केंदाळ (पाण वनस्पती - नेमकं काय म्हणतात ते माहिती नाही) नदीवर जमा होतं व प्रचंड फोफावतं आणि नदीवर हिरवा गालीचा अंथरल्यासारखं दिसतं. पण त्यामुळे पक्षी जीवांचे प्रचंड हाल होतात. 
हे पाषाणचे तळे आणि पुणे शहरातील पक्षांचे आश्रय स्थान. हे तळे ब्रिटिशांनी बांधून घेतले. त्यांच्या गरजेनुसार त्यांनी हे छोटेखानी बंधारा बांधून तळे केले. इथे वेगवेगळे पक्षी भरपूर प्रमाणावर बघावयास मिळतात. या तळ्याची अवस्था सुद्धा तशीच असते जशी म्हातोबा मंदिराशेजारील जाणाऱ्या नदीची होते.
हा गड कोणता? 
पुणे-पाबे-वेल्हे रस्त्यावरून अगदी सुर्योदयाआधी पोचलात तर असे दृश्य बघावयास मिळते. असं वाटतं की सिंहगड एका हाताने सूर्याला हळूहळू वर उचलतोय. 
सूर्योदयाच्या आधी आकाश गुलाबी रंगात न्हाऊन जाताना बरेच वेळा पाहिलं होतं. पण त्यातील थोडा रंग पाण्यावर सांडलेला पहिल्यांदाच बघत होतो. ते देखील माझ्या पहिल्यावहिल्या होडी-ट्रिप मधे. भिगवनची ती सकाळ अविस्मरणीय ठरली ती याच आणि अशाच कारणांमुळे.
हिंजेवाडी. सकाळी आठ वाजता. एकाच रंगाच्या अनेक शेड मधे रंगून जातं. ते उंच बिल्डिंगच्या खाली दिसणारं धुकं नव्हतं. तो गाड्यांचा धूर होता. आपण प्रदूषण किती पसरवत आहे, याचं हे एक उदाहरण.

हा फोटो पाहिला की भिगवणाला जायची इच्छा तीव्र होते. सकाळचा तो सोनेरी सूर्योदय, त्या दिशेने जाणारे ते फ्लेमिंगो आणि ते सोनेरी जलाशय ज्याचा किनारा खूप दूरवर असणारा. 


अग्निपंख, हंसक पक्षी किंवा फ्लेमिंगो. - भिगवण
अजून पूर्ण वाढ न झालेलं फ्लेमिंगो पक्षाचं पिल्लू. वीर डॅम वर हे पक्षी आल्याची बातमी कळाली आणि आम्ही पोचलोच. याने मान वर केली आणि उंची मोजली तरी किमान साडेतीन चार फूट नक्की भरली असती.
याचा जवळून फोटो काढता यावा म्हणून आम्ही अक्षरशः रांगत हळूहळू गेलो. खरंतर त्यावेळी आमचा कुणीतरी फोटो काढायला हवा होता. 
भिगवण ला जेंव्हा दुपारी वाहत्या पाण्याचा स्रोत ओलांडून पलीकडे गेलो आणि मी व योगेश तेथील गवतावर आडवे झोपून आमचे कॅमेरे सज्ज ठेवले. या बाई खूप धाडशी. (यांचं नाव मात्र मला माहिती नाही. हो या बाईच होत्या. बापय पिवळा धमक असतो एवढंच माहिती). या बाई अगदी चार फुटावर आल्या आणि मस्तपैकी खाणं सुरु ठेवलं. मी फोटो काढतच होतो. आणि नेमकं कॅमेऱ्यातील कार्डमधील जागा संपली. 
विणकर पक्षी. खूप सुंदर घर बांधण्यात पटाईत असलेला हा पक्षी. गवताच्या काड्या आणण्याचं काम महिला करतात आणि त्याचं रूपांतर घरात होतं. छोटेखाणी घर तयार करताना त्यांची धावपळ बघण्यासारखी असते. पावसाळ्याच्या तोंडावर हे पक्षी घरटे बांधण्यास घेतात. 
मला या सारड्याचा फोटो इथे टाकावासा वाटला. कारणही तसंच. याची पोज एखाद्या नामांकित नेत्यासारखी वाटतेय. एखादं भाषण द्यावं आणि इकडे तिकडे मान वळवून एखादा शब्द उच्चारून थोडावेळ एखाद्या ठिकाणी बघत पुढच्या ओळींची मनात तयारी करण्यासारखा हा सरडा त्या लोखंडी खांबावर ऊन खात बसलेला होता. 
रानटी फुलांचे फोटो काढण्यात वेगळीच मजा असते. त्यावर असणाऱ्या कोळ्यांच्या जाळ्यांच्या तारा स्पष्ट दिसल्या की लगेच समजतं, हे फुल शहरी मुळीच नाही.
रानटी फुलात पण किती नक्षी असते. हे दगडी फुलांसारखं पण थोडं वेगळेपण जपणारं फुल मी पहिल्यांदाच बघत होतो. 

नुकत्याच झालेल्या पाबे-वेल्हे घाटातील भटकंतीवेळी, एखादा वाट चुकलेला ढग सिंहगडाशी सलगी करू पाहत होता. परतताना मागे वळून पाहिल्यावर कळालं की तो एकटाच नव्हता तर इतर पाहुणे मंडळी मागून येतच होती.
मी आणि योगेश वीर डॅमला व्हिजिट करायला चाललो होतो. पुणे-कोल्हापूर हाय वे वर एक गॅसचा टँकरने लोळण घेतली आणि दोन्ही बाजूला गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. म्हणून आम्ही तो बेत रद्द करून सिंहगड पायथ्याला पक्षांचे फोटो तरी काढावेत म्हणून मार्ग बदलला या कल्याण गावाकडून घाटातून वर आलो आणि समोरच सिंहगडाने असं दर्शन दिलं.
हम दो हमारे दो। या स्लोगनची आठवण किंवा चांडाळ चौकडी म्हणा हवं तर. पानशेतच्या बॅकवॉटर वर विसावलेली ही चार झाडं चौकोनी कुटुंबाची किंवा चार मित्रांची बरोबरी करू पाहत होती.
पाबे-वेल्हे रस्त्यावरील एक ठिकाण आणि ऐन पावसाळ्यातील तो प्रचंड गरमीचा दिवस आणि त्या दिवसातील ही अशी साडेपाच सहाची संध्याकाळ. कुठेही ढग नसलेलं ते आकाशसुद्धा असं धगधगीच वाटत होतं.
दिवसभर फिरून आलेलो आणि संध्याकाळी सीमाच्या (उदय ताकभातेंची बहीण) मुलीचे म्हणजे आर्याचे फोटो सेशन करायला डांगे चौक, चिंचवड मधील बागेत गेलो. सूर्य मावळे पर्यंत तिचे फोटो काढणं सुरु होतं. हे पहिलंच फोटो सेशन होतं. त्या बागेत हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. Silhouette प्रकारात त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
अशाच एका संध्याकाळी, हिंजेवाडीच्या मागे फिरताना या ठिकाणी जाऊन पोचलो होतो. या ठिकाणला दिलेली ही दुसरी भेट पण पावसाळ्यातील. पाऊस नव्हताच पण पाऊस येईल की काय असं वाटावं अशी ढगांनी गर्दी केली. त्यातून बाहेर पडायला सूर्य किरणे घाई करत होते. आणि मला एक छानसा पॅनोरमा मिळाला.
त्याच ठिकाणी फेब्रुवारी किंवा मार्च ची एक संध्याकाळ. माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक. 
हे मुळशी बॅकवॉटर. अप्रतिम जागा. केंव्हाही गेलो तरी रिकाम्या हातांनी परत येत नाही. वर्षातील कोणताही दिवस असो, तो दिवस या ठिकाणी रम्य आठवण देऊन जातो. हा मी काढलेला पहिला पॅनोरमा. तो सुद्धा ट्रायपॉड न वापरता. मी आजही पॅनोरमासाठी ट्रायपॉड वापरत नाही. 
ही संध्याकाळ मार्च मधील. उदय ताकभातेंबरोबर खूप वर्षांनी या ठिकाणी गेलो. उदय असला की आम्हाला वेळेचं भान राहत नाही आणि अशी संध्याकाळ बघायची संधी मिळते.
वरील पैकी सर्व ठिकाणे पुण्यातील. आता थोडं कोल्हापूर. 
राधानगरीला घेऊन जाणारा हा दोन पदरी रस्ता. दोन्ही बाजूला उंच आणि गर्द झाडी. त्यातून कुठेतरी शिरू पाहणारी सूर्याची किरणे. यावर्षी दिवाळीत अशीच हळुवार भटकंतीत हे दृश्य थोडावेळ स्थब्द करून गेलं. 
झाडांचा बोगद्या असल्यासारखं वाटतं ना?
दिवाळीतील चार दिवसांच्या सुट्टीतील प्रत्येक संध्याकाळ या राधानगरी रोडवरच भटकलो. हे छोटं टुमदार कौलारू घर, माळरान, निलगिरीची झाडं, ते थोडेफार ढग, त्यावर विविध रंगरंगोटी करणारा तो संधीप्रकाश. हे ठिकाण मला माझ्या लहानपणीची आठवण करून देतं. मी पाचवीत असताना आमच्या नवीन घरात राहायला गेलो. संध्याकाळीशाळेतून घरी परतताना मी खुपवेळा असं दृश्य बघायचो. आता कॉलनी भरून गेलीय. माळरान कुठे गायब झालंय. 
दिवसाचा निरोप घेणारा हा सूर्य जसा त्यादिवसाच्या आठवणी मनात ठेऊन निरोप घेतो तसा ३१ डिसेंबरला सुद्धा यावर्षीच्या गोड-कडू आठवणी देऊन जाईल. त्यातील कडू आठवणी आपण विसरून जाऊ आणि गोड आठवणींसोबत नवीन वर्षांचं स्वागत करू. 

यावर्षीच्या या काही आठवणी. खूप शिकवून गेल्या. फोटोग्राफी करताकरता लिहावसं वाटलं ते उदय ताकभातेंमुळे. एकदा सहज त्याने सांगितलं की फोटो सोबत ब्लॉग लिही. आणि आता हा तिसरा ब्लॉग. उदय धन्यवाद. 
तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना तसेच तुमच्या मित्रमंडळींना नवीन वर्षाच्या लाखलाख शुभेच्छा. पुढील वर्षी तुमची अशीच सोबत राहो. धन्यवाद. 

No comments:

Post a Comment