तुम्हाला कधी असं जाणवलंय की तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखाद्या दिवसाच्या अनुभवात इतके डुंबून जाता की दोन तीन दिवस त्यातून बाहेर पडत नाही. मी असा दिवस नुकताच जगलो.
मागचा रविवार ( दिनांक २९ - ११ - २०१५ ) मला अजूनही आठवतोय. निशब्द करून टाकतो. खरंतर इतरांसाठी अजिबात वेगळा न वाटणारा तो अनुभव मात्र मी अगदी पहिल्यांदाच घेतला होता.
शनिवारी आमचा म्हणजे आमच्या Shutterbugs ग्रुपचा दुसऱ्यादिवशी अर्थात रविवारी भिगवणला जायचा बेत ठरला. मी सोडून सगळे बर्ड फोटोग्राफर. मला लँड्सकेप फोटोग्राफी आवडते. आणि भटकंती सुद्धा. आधी ठरलं सकाळी सहाला पुण्यातून निघायचं. पंकजने सल्ला दिला की सूर्योदयाच्या आधी पोचलात तर खूप चांगले फोटो काढायला मिळतील. पुणे ते भिगवणचे अंतर पाहता ज्याठिकाणी फोटोग्राफीसाठी पोचायचं तिथपर्यंत जायला दोन सव्वादोन तास तरी लागणार होते. योगेशच्या कार मधून जाणार होतो. सूर्योदय साधारण ६.३० ते ६.४५ च्या दरम्यान असतो याची कल्पना आम्हाला होतीच. म्हणजे आम्हाला पहाटे चारला पुण्यातून निघणे भाग होते. आणि बाकीचे संमत झाले. हे सगळं व्हाट्सअप्प ग्रुप वरील गप्पांमध्ये ठरलं. ' झोपा आता ' कुणीतरी मेसेज टाकला. ' कार्ड मोकळं करा आणि बॅटरी चार्जिंगला लावा ' दुसऱ्याने मत मांडलं आणि सगळे गायब झाले. साडेअकरा वाजून गेले होते. मी मोबाईलच्या घड्याळात तीनचा आणि तीन दहा चा असे दोन गजर लावले. आणि पुढील दोन तीन मिनिटात झोपलो देखील.
बरोबर पहाटे तीनला जाग आली. मोबाईल मध्ये पाहिलं तर लक्षात आलं की मी गजर वाजण्याची वाट पाहिली असती तर वेळेत उठलोच नसतो. गजरची वेळ दुपारची दाखवत होती. नेहमीसारखं मी चुकीचा गजर लावला होता.
पटकन उठून आवरलं. कॅमेऱ्यात कार्ड आणि बॅटरी तपासली. पाण्याची बाटली आणि थोडं खाणं बॅगेत टाकलं. अंगात थंडीतलं जॅकेट लटकवून बॅग अडवली व घरातून ३.५० ला बाहेर पडलो. बाहेर अंधार. पहिल्यांदाच इतक्या पहाटे मी घरातून बाहेर पडत होतो. भटक्या कुत्र्याचा विचार मनात आला. काही झालं तरी गेलंच पाहिजे. पण जाताना एकही कुत्रं दिसलं नाही. कारण नुकतीच थंडी पडायला लागली होती (जरा उशिराच म्हणजे एक महिना उशिरा).
सिंहगड रोड वरील संतोष हॉलच्या समोर सत्यजित, योगेश आणि आशु थांबले होते.
२० वर्षांपूर्वी मी पुण्यात आलो तेंव्हा योगेशची ओळख झाली होती. आम्ही दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. सत्यजितची ओळख यावर्षीची, जानेवारीत वाकडच्या बागेत आम्ही फोटो काढायला गेलो होतो तेंव्हाची. योगेश आणि सत्या पहिल्यांदाच एकमेकांना भेटले. आशु आणि सत्याची ओळख अशीच फोटोग्राफी दरम्यान झालेली. विरेशही चालत तिथे पोचला. आशु आणि विरेश ची ओळख झाली. बॅगा गाडीत टाकल्या आणि लगेच निघालो, तरी ४.२० झालेच होते.
गाडीत गप्पा रंगल्या. सत्यासोडून सगळे मराठी बोलणारे. सत्या कोलकत्याचा. म्हणून जास्तीतजास्त हिंदीत बोलणं पण मराठीत बोलणं थांबलं नाही. आताकुठे सत्याला मराठी थोडं कळू लागलंय. पण तो हिंदीतून दाद देत होता.
योगेशची ड्रायविंग मस्त आहे. सुसाट चालवतो पण अगदी योग्यठिकाणी वेग कमी देखील ठेवतो. उगाच वेडीवाकडी नाही चालवत. चार चाकी गाडीच्या प्रवासाचा अनुभव नसलेल्या आशूला काही सुचत नव्हतं. त्याच्याबाजूची काच थोडी खाली करूनच बसला. आम्ही अगदी वेळेत पोचलो गप्पा मारतामारता कधी पोचलो काहीच कळालं नाही. त्यात सगळीकडे अंधार. गूगल मॅप वरून अंदाज घेऊन भिगवनचा शोध लावला. रात्रीच पंकजकडून तेथील गाईडचा म्हणजे संदीप नगरेचा नंबर घेतला होता त्याला पुढील रस्ता विचारला. तो तयारच होता. आम्हाला फ्रेश होण्यास सांगितले पण सूर्योदयापूर्वी आम्हाला जागेवर जायचं होतं. त्याने त्याच्या माणसाला आमच्या गाडीतून जायला सांगितलं. आणि आम्ही पोचलो.
पूर्वेला गुलाबी झाक दिसत होती. लक्षात आलं की सूर्य त्याचं दर्शन द्यायला निघालाय. पूर्वेला थोडे ढगही होते. अगदी पुढील दहा मिनिटे तरी सुर्योदयाला वेळ होता. समोर अथांग समुद्रासारखं पाणी आणि त्यात काही होड्या. केक वर आयसिंग असावं तसं पाण्यात आकाशातील गुलाबी छटेचं प्रतिबिंब. सगळीकडे निळसर धुकं. अगदी तृप्त झालो. कॅमेरा सज्ज करून वेळ न घालवता चारपाच फोटो काढले.
इतरांकडे माझं लक्ष नव्हतं. ते चौघे एका बोटीत जाऊन बसले. मला सत्याने हाक मारली व म्हणाला,' जल्दी आ जाओ, हम बोट में जा रहे है।' आणि मी हादरलो. अरे बापरे! होडीतून प्रवास करायचा? एक मिनिटभर मला काही सुचलंच नाही. सगळे बोलवत होते.
मला पोहता येत नाही. तीन चार वेळा प्रयत्न करून सुद्धा मला कधीच पोहायला जमलं नाही. माझे वडील आणि सगळे भाऊ पट्टीचे पोहणारे. मी पाण्यात जायला घाबरतो. समुद्रात गेलो तरी फारतर फार गुढगाभर पाण्याच्या पुढे जात नाही. होडीचा प्रवास नेहमी टाळतो. बुडाली तर काय?असा नेहमी नकारात्मक विचार मनात येतो.
मी आधी सगळ्यांना नाही म्हणालो. योगेशने धीर दिला आणि त्याला सुद्धा पोहता येत नाही हे सांगून टाकले. असेलनसेल तितका धीर एकवटून होडीत चढलो आणि लगेच दिसेल त्याठिकाणी पटकन बसलो. बोटीत जेंव्हा तो गाईड चढला तेंव्हा बोट थोडी हेंदकाळली. आणि माझा जीव वर खाली झाला. दोन्ही बाजूला हात घट्ट पकडून बसलो. फोटो काढायचं भान राहिलं नाही.
पाणी शांत होतं. होडी हळूहळू पुढे सरकत होती. जास्ती हलत नव्हती म्हणून जीवातजीव आला. पुन्हा कॅमेरा हातात घेऊन फोटो काढायला सुरवात केली.
होडीचा वरील काठ पाण्याच्या पातळीच्या थोडा वर होता. अथांग पाण्याची पातळी बघून थोडं मस्त वाटत होतं. त्यात सूर्य दर्शनाची वेळ जवळ येत होती. गुलाबी छटा अजून गडद झाली होती. असं वाटत होतं की आजूबाजूचा परिसर फोटो काढून घेण्यासाठी तयार होऊन बसला आहे. पाण्याच्या पातळीच्या इटक्याजवळून तेही पाण्यात (म्हणजे होडीत) बसून फोटो काढण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. त्यात होडीचा प्रवासही पहिलाच. अगदी सुखद. मनोहारी सभोवतालच दृश्य बघून माझ्यातला मी हरवून गेलो. सतत कॅमेरातील सेटिंग बदल फोटो काढत होतो. आमच्याभोवती कितीतरी वेगवेगळे पक्षी होते. काही आधीच पोचले होते तर काही कळपाकळपानेे येत होते. काही पक्षी पाण्यात उतरताना खुपवेळा मी पाहिले होते, पण ज्याठिकाणी पाण्यात सूर्योदयाच्या बाजूच्या रंगांच्या छाटांचे प्रतिबिंब पडले होते त्यात त्यांचं येऊन उतरणं मी पहिल्यांदाच बघत होतो. जणू काही ते सर्व सुर्यनारायणाचे स्वागत करण्यासाठी जमा होत आहेत. भान हरपून जावं अशी दृष्ये समोर होती.
प्रत्येक दृष्य कॅमेराबंद करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो. प्रत्येक क्षण वेगवेगळे अनुभव देत होता. डोळ्याचं पारणं फिटलं आणि कॅमेऱ्यातील शटर सुद्धा वरखाली करून कंटाळून गेलं असेल.
आणि सुर्यनारायण ढगाआडून बाहेर आले. त्यांची सोनेरी किरणे सर्वत्र पसरली. तसं पाण्यातील प्रत्येक लहर सोनेरी रंगात उजळून निघाली. लांबपर्यंत दिसणारी ती पाण्यावरील सोनेरी रेघ डोळे दिपवून टाकणारी होती. कॅमेरा थोडावेळ बंद करून तो क्षण नजरबंद केला. अगदी स्तब्द झालो. मी माझा राहिलोच नाही. कुठे हरवलो कोण जाणे! ते काही क्षण खरंच जगलो.
योगेशने थोडं हलवून मला भानावर आणलं आणि ज्यागोष्टींचे फोटो काढायला आम्ही इथंवर आलो होतो तिकडे बोट दाखवलं. अग्निपंख किंवा फ्लेमिंगो.
उंचच्या उंच त्या सुंदर पक्षांच्या दिशेने आम्ही पुढे सरकत होतो. पांढराशुभ्र, पंखावर रक्तवर्णी छटा, थोडी वाकडी पण गुलाबी चोच, पिवळे डोळे, लांब मान आणि काड्यांसारखे गुलाबी पाय. पाच सहा फूट उंचीचे ते सुंदर पक्षी मी यापूर्वी फक्त फोटोतच पाहिले होते. आता प्रत्यक्षात ते समोर पाहून मतीगुंग झाली. कॅमेरा सरावून फोटो काढायला सुरु केलं. मोजकेच फोटो काढले. फोटोग्राफीचा अजून अनुभव कमी असल्याची जाणीव झाली. अशा उंच पक्षाचे फोटो कसे काढायचे तेच कळत नव्हतं. दुसऱ्या काही फोटोग्राफरची होडी फार जवळ गेली तसे पहिला ग्रुप पटपट उडून गेला. मग दोन्ही होड्या दुसऱ्या ग्रुप कडे वळाल्या. आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. फोटो काढणं चालूच होतं. कॅमेराच्या आय-पीस मधून पाहून फोटो काढताना आम्ही फ्लेमिंगोच्या किती जवळ गेलोय हे कळालं नाही. सेटिंग बदलण्यासाठी कॅमेरा डोळ्यापासून दूर केला तेंव्हा जाणवलं की आम्ही त्या फ्लेमिंगोना कवेत घ्यायला चाललोय.
इतक्या जवळ गेल्यामुळे तो ग्रुप देखील बिथरला. मी लगेच सगळ्यांना हळू आवाजात बोललो की ते आता उडणार आहेत. ज्यांना लक्षात आलं त्यांनी त्यांच्या कॅमेराचे सेटिंग पटकन बदलले आणि मीच बदलायचं विसरलो. पुढच्या चार पाच सेकंदात त्यांनी दोन चार पावले पळत उड्डाण केलं. मी शक्य तितका प्रयत्न केला. कॅमेरा हलू नये याचा खटाटोप करत होतो पण होडी थोडी हलतच होती. पाच सहा सेकंदांचा खेळ.
तो फ्लेमिंगोंचा कळप खूप दूर जाऊन बसला. आमच्यापैकी कोणीही बोलत नव्हतं. सगळेजण आपापल्या कॅमेरात डोकाऊन बसलेलो. बघत होतो की आम्हाला योग्य असे फोटो काढता आलेत की नाही. पण कॅमेराच्या छोट्या स्क्रीन वर लक्षात येत नव्हतं. घरी गेल्यावर लॅपटॉपच्या स्क्रीनवरच कळू शकणार होतं.
आमच्या गाईडने होडी परतीच्या मार्गावर आणली. जाताना काही सी गल नावाचे पक्षी इकडे तिकडे फिरताना दिसत होते. सुंदर पक्षी. मासेमारीत तरबेज. फ्लेमिंगो आणि सी गल हे दोन्ही स्थलांतरित पक्षी. तसे बरेच आहेत. मला फारशी माहिती नाही. त्यांचे आगमन साधारण नोव्हेंबर च्या दरम्यान होते व गमन शक्यतो मार्च मध्ये. पण उन्हाळा जर लवकर सुरु झालातर लवकर ही जातात. हे पक्षी उत्तरेकडून हजारो मैलांचे अंतर कापून आपल्याकडे म्हणजे भारतात किंवा दक्षिणी आशिया खंडात कसे काय येतात हे मला नेहमी पडलेलं कोडं! सी गल चे काही उडतानाचे किंवा मासेमारी करतानाचे फोटो काढले. सूर्य बऱ्यापैकी वर आलेला, त्यामुळे फोटो थोडे चांगले निघालेत असं जाणवलं.
पोटात कावळे जोरजोरात ओरडत होते. घरातून निघाल्यापासून आम्ही फक्त एका चहाच्या कपावर समाधान मानलं होतं. आम्ही संदिप नगरे च्या म्हणजे आमच्या गाईड च्या घरी परतलो. आधी पोहे आणि नंतर ऑम्लेट वर ताव हाणला. चहा घेतला आणि पुढच्या स्थळी रवाना झालो. पुन्हा होडीतून प्रवास होता. सवय पडल्यासारखी मी पण लगेच तयार झालो. पण थोडी धाकधूक होतीच. यावेळी संदीप ने दुसरा गाईड सोबत दिला.
थोडं चालून होडीच्या ठिकाणी पोचलो. पाण्यात आधीपेक्षा खळखळाट जास्ती होता. पुन्हा धीर एकवटून होडीत बसलो ज्यात कुठूनतरी थोडं थोडं पाणी झिरपत होतं. ते बघून कसाबसा गोळा केलेला धीर कुठेतरी पळून गेला. पण त्या गाईड ने थोडा धीर दिला. योगेश सुद्धा थोडा घाबरलेला वाटला. पण तरी आम्ही गप्प बसलो. गाईड ने होडी पाण्यात लोटली आणि आमचा हेंदकाळत प्रवास सुरु झाला. आता आम्ही नदीच्या पात्रातून जात होतो आणि जिथे पाणी वाहत होते त्याच्या थोडं विरुद्ध दिशेने जात होतो. होडी प्रचंड हालत होती आणि मी अतिशय कासावीस झालो. गाईड ने सांगितलं की आपण नदी पार करून दुसऱ्याबाजूला काही त्याच भागात दिसणारे पक्षी पाहून येऊ. हेंदकाळत जाणाऱ्या होडीत मी फोटो काढण्यापेक्षा बाजूच्या फळीला घट्ट पकडून ठेवणं पसंद केलं. उगाच मनात सारखी शंका येत होती की होडीतलं पाणी वाढायला लागलंय. प्रचंड घाबरलेलो. बाकीचे फोटो काढताकाढता माझ्याकडे बघून हसत होते. माझा सारखा परत चला चा घोषवारा सुरु होता. पण कुणीही दाद देत नव्हते. होडीतून खाली उतरेपर्यंत मी एकही फोटो काढला नाही. दुसऱ्या किनाऱ्यावर उतरल्या उतरल्या मी गाईडला विचारले चालत जाण्याचा मार्ग आहे का? त्यावर त्याने सांगितले की सात आठ किलोमीटर चालावे लागेल. त्या उत्तरावर मी गप्प झालो. म्हटलं आपण काहीतरी शोध लावू.
गाईड, सत्या, विरेश आणि आशु पुढे फोटो काढायला गेले. मी आणि योगेश तिथेच थांबलो. योगेशच्या घशाला कोरड पडली होती आणि आम्ही पाणी आणायचं विसरलो होतो. लांबवर होड्यांमध्ये काही लोकं काम करताना दिसत होती. मी आणि योगेश तिकडे जायला निघालो. मनात विचार आला की परतीचा चालत जाण्याचा मार्गदेखील शोधू. पुढे गेलो पण मार्ग काही जवळ असण्याची चिन्हेपण दिसली नाहीत आणि त्या होड्या देखील आत पाण्यात असल्याचं जाणवलं. मग काहीही विचार न करता परत आमच्या होडीकडे परतलो. बाकीचे परतले. मगाशी जोरात वाहणारा वारा थोडा शांत झाला होता. कदाचित परतीचा दुसरा मार्ग न सापडल्याने मला वारा जास्ती जाणवला नसेल. परतताना होडी देखील कमी हालत होती. कसं असतं ना! संकटाला तोंड देण्याची एकदा का माणसाच्या मनाची तयारी झाली की पुढच्या संकटाची भीती कमी वाटू लागते. कदाचित माझं तसं झालं असेल किंवा खरंच होडीचं हेंदकाळनं कमी झालं असेल.
एकदाचे पूर्वीच्या जागी सुखरूप पोचलो. संदीप च्या घरी पोचलो. जेवणाची व्यवस्था त्याने करूनच ठेवली होती. तुडुंब जेवलो. शाकाहारी जेवण. गावाकडचा मस्त बेत. वांग्याची पातळ भाजी, टोमॅटोची सुकी भाजी, कांदा भजी, भाकरी, वरण भात. सोबतीला चिरलेला टोमॅटो आणि काकडी, दही, छोटे पापड आणि लोणचं.
आम्ही काहीच बोलत नव्हतो. तोंडाची आणि हाताची जुंपली होती. चव इतकी सुरेख की पोट नको म्हणत होतं पण तोंड थांबत नव्हतं. अगदी तृप्त झालो.
संदीप बरोबर ओळख वाढली. कळालं की त्याच्याकडे राहायची सोय देखील आहे आणि ती देखील कमी किमतीत. बील त्यामानाने खूप कमी झाले. दोन वेळा होडीतील दीड दीड तासांचा प्रवास, पक्षांची माहिती, सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण आणि खूप सुंदर असा अनुभव. पाच जणांमध्ये फक्त दोन हजार रुपये. लगेच देऊन, संदीप बरोबर फोटो काढून आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला लागलो.
येताना गाडीत फारसं कुणी बोलत नव्हतो. आम्ही आमचे फोटो कॅमेराच्या छोट्या स्क्रीन वर बघत एकमेकांना दाखवत होतो आणि शाबासकी मिळवत होतो. योगेश गाडी चालवत होता आणि आमचे फोटो मी त्याला दाखवत होतो. परत संध्याकाळी सहाच्या आसपास अगदी मरगळलेल्या अवस्थेत आम्ही संतोष हॉल जवळ गाडीतून उतरलो. सगळ्यांचा निरोप घेऊन घरी परतलो. खूप थकवा जाणवत होता. म्हणून लवकर झोपी गेलो.
दुसऱ्यादिवशी म्हणजे सोमवारी मला आतून जाणवलं की मी अजूनही घरी परतलोच नाही. अजून मन तिथेच त्या होडीत आणि त्या संथ आणि स्वप्नाळू पाण्याच्या तरंगाबरोबर हेंदकाळे घेत बसलंय. ऑफिसमध्ये शांतपणे काम करत होतो. आवाजातील धारदारपणा कुठेतरी हरवला होता. फारसं बोलत नव्हतो. बोललो तरी खूप हळुवारपणे बोलत होतो. मी ..... मी मला खरंच हरवून गेलो.


















































