Thursday, December 17, 2015

सिंहगडाच्या अवतीभोवती...

भिगवनचा तो भान विसरायला लावणारा अनूभव घेतल्यानंतर मी जरा आळसावलोच होतो. तरी त्यानंतरच्या शनिवारी मी आणि आशू फोटोग्राफी साठी जायचं ठरवलं आणि जाऊन आलो. बाकीचे कोणीच येणार नव्हते. आधीच उठायला उशीर झालेला. त्यात आशू सिंहगड रोडलाच राहतो असं वाटून मी आवरून फोन केला. नंतर कळालं की तो बानेरला राहतो. मागे खडकवासला बॅक वॉटर च्या एका ठिकाणी मला आणि योगेशला Black Ibis चे छान फोटो काढायला मिळाले होते म्हणून आशूबरोबर पुन्हा तिथे जायचा प्लॅन केला. पण आमचा उद्देश सफल झाला नाही. पानशेतच्या धरणातून पाणी सोडलेलं होतं त्यामुळे खडकवासलातील सगळेच पक्षी कुठेतरी लांब जाऊन बसले होते. फारसे फोटो काढले नाही. ऊन फार तापलं होतं. यावर्षी पाऊस कुठेतरी दडा मारून बसला होता. त्यामुळे हिवाळा सुरु झाला तरी थंडीचं काही लक्षण दिसत नव्हतं. येताना आशू म्हणाला की पाबे-वेल्हे रोड लँड्सकेप फोटोग्राफी साठी छान आहे. पुन्हा कधीतरी जाऊ. त्याने कसं जायचं हे देखील दाखवलं. तो रस्ता बहुतेक माझ्या माहितीतला होता.
रविवार पूर्ण आळसात गेला. खाणं पिणं आणि झोपणं, इतकंच दिवसभरात पार पडलं. मागचा आठवडा तसा थोडा दगदगीचाच गेला होता. कामाचा व्याप सांभाळता सांभाळता शनिवार कधी आला ते कळलंच नाही. कालचा शनिवार खूपच उशिरा उजाडला. एकूण काय तर मी पुन्हा आळसावलो होतो. मागच्या रविवारासारखाच हा शनिवार पण गेला. दुपारी एकला घरातून बाहेर पडलो आणि लक्षात आलं की अरे काय सुंदर दिवस होता आणि मी तो वाया घालवला. थोडं वारं वाहत होतं त्यामुळे धुक्याचा मागमूस नव्हता. स्वच्छ निरभ्र निळं आकाश मला साद घालतं होतं, वाकुल्या दाखवत म्हणालं, अरे आळशी माणसा, जरा घराबाहेर पड! बघ हा निसर्ग कसा दोन्ही हात पसरून तुला बोलावतोय. एक सुस्कारा सोडून मनाशी ठरवलं, उद्या नक्की. घरी परतल्यावर मागचे काढलेले पण developing न केलेले फोटो develope करत दिवस घालवला. संध्याकाळी बेडरूम च्या खिडकीतून सूर्यास्त पाहताना विचार केला खरंच आजचा दिवसही वाया घालवला.

रात्री आशू आणि वीरू (विरेश) यांचा प्लॅन ठरला. ते दोघे सिंहगडाच्या पायथ्याला दरी जंगलात पक्षांचे फोटो काढायला जाणार होते. मी आणि योगेश भिगवनाला जायच्या आदल्याच दिवशी तिथे जाऊन आलो होतो. पुन्हा जायची इच्छा नव्हतीच. तीनवेळा तिथे गेलो पण तिथली फोटोग्राफर लोकांची गर्दी पाहून हिरमुड झालो होतो. त्यात लँड्सकेप फोटो आधीच काढलेत. पुन्हा नवीन काही मिळेल असं वाटत नव्हतं. तसेच मी सकाळी किती वाजता उठेन याची देखील खात्री नव्हती. म्हणून त्यांना काहीही सांगितलं नाही. माझ्यामुळे त्यांना उशीर होऊ नये हा उद्देश.
मी माझ्या मोबाईल मध्ये शनिवार रविवार साठी  पहाटे ५.३८ चा गजर लावून ठेवलाय. त्याने त्याचं काम नेहमी सारखं चोख बजावलं. मी डोळे किलकिले करून गजर बंद केला आणि पुन्हा झोपी गेलो ते आठलाच उठलो. बाहेर पडावं की नको या मनस्थितीत अंघोळ उरकली. कपडे अंगात चढवली आणि पुन्हा खुर्चीत जाऊन बसलो. कोणता बूट घालावा? जॅकेट घ्यावं की नको? की चहा नास्ता करून यावं आणि पुन्हा ताणून द्यावी? दहा मिनिटे अशीच गेली. झोप तर नव्हतीच. डी एस के विश्वमध्ये आल्यापासून माझी झोप छान होतीये. इथलं वातावरणच इतकं छान आहे की झोप पूर्ण होऊन लवकर जागही येते.
मनाचा हिय्या करून उठलो. लटकवलेला पिवळा शर्ट अंगात चढवला. बाहेर पडल्यावर लक्षात आलं की तो मळलेला आणि सुरकुतलेला आहे. बॅगेत कॅमेरा आणि पाण्याची बाटली टाकली आणि उठलोच. जवळच्याच टपरीवर पोहे आणि चहा पोटात ढकलला. आणि निघालो. कुठे जाणार? फोटो काढायला मिळालच पाहिजे असं काही नव्हतं. किंबहुना मी कॅमेरा फक्त सोबत असु देत म्हणून नेणार होतो. गाडी सिंहगडाच्या दिशेने नेली. गाडीचा वेग कमीच होता. सिंहगडावर जाणाऱ्यांची गर्दी जाणवत होती. मला उशीर झाला होता. सूर्य बराच वर आलेला पण ऊन फारसं भाजत नव्हतं. आजही आकाश स्वच्छ होतं, जसं की खूप नीळ घालून धुतलेले कपडे घालून सूर्याच्या उबदार उन्हात येऊन बसलं असावं. खडकवासला च्या पाण्याजवळून जाताना सहज पुण्याच्या दिशेने लक्ष गेलं. तिकडंच आकाश थोडं मळकट कळकट दिसलं. इतक्या सकाळीसुद्धा त्यादिशेला धुराचा पट्टा सहज दिसत होता. आणि त्याच्यावर स्वच्छ आकाश दिसतं होतं. आपण किती प्रदूषण करतोय हे प्रकर्षानं जाणवलं.
गाडीने सिंहगडाच्या पायथ्याला उजवीकडे वळण घेतलं आणि पुढे काही किमी वर डावीकडे पाबे-वेल्हे चा फलक दिसला. लगेच वळालो. विचार केला की मागेच ठरवलेली मोहीम आजच पार पाडू. मी एकटाच. म्हणजे या भटकंतीतील मी एकटाच होतो. उद्देश फक्त आणि फक्त भटकंती. गाडीचा वेग अजून कमी झाला. २५-३० चा असेल. मला चारचाकी पेक्षा दोन चाकी गाडीवरून भटकायला आवडत. पहिलं कारण, चारी दिशेला विना कसरत पाहता येतं. आणि दुसरं म्हणजे कुठेही थांबता येतं. रस्त्याच्या कडेला विनासायास गाडी उभी करता येते. ज्यामुळे रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजीसुद्धा घेता येते. काही तोटेही आहेत पण नेहमीच तसा विचार करायची गरज मला तरी जाणवत नाही.
या महाराष्ट्राला खरंच निसर्गाने भरभरून दिलेलं आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. डोंगरातील त्या घाटवाटेवरून जाताना दोन्ही बाजूला तुमचं स्वागत करायला भरपूर झाडे उभी असतात. काहीही उद्देश न ठेवता केलेल्या अशा भटकंतीत आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो. स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा. डोळ्याला सुखावणारी झाडे. ते आव्हान देणारे डोंगर. त्या वळणावळणाच्या घाट वाटा. पक्षांची किलबिल. सगळंच कसं भरभरून. तो घाट संपता संपता काल जाणवणारा मागील आठवड्याचा तो शीण एकदम नाहीसा झाला. मन ताजंतवानं झालं. मरगळ हटली आणि तेंव्हाच त्या उंच ठिकाणावरून खडकवासलाचं पाणी नजरेस पडलं. थोडावेळ बघत राहिलो. हो, मी यापूर्वी एकदा या रस्त्यावर येऊन गेलोय. कदाचित इथेच थांबलो असेन. सहाजिकच मी तीन चार फोटो काढले. आणि पुढे निघालो.

वेग कमीच होता. घाट संपता संपता आजूबाजूचं जंगल सुद्धा संपलं. रस्त्याच्या कडेला जी काही दोन चार झाडे होती तेवढीच. दूरपर्यंत फक्त माळरान पसरलेलं. सोनेरी रंगात न्हाऊन निघालेले गवत, डावीकडे लांबवर दिसणारी झाडांची गर्दी. त्यातून डोकावणारी एका गावातील कौलारू घरे. गावच्या मंदिराचा गुलाबी रंगात रंगवलेला कळस मात्र ठसठशीत दिसतो.

त्यामागे सिंहगड पाय पसरून उन्हाला पडलेला होता. त्याच्या दरीतील थोडं निळसर धुकं सोडलं तर इतरत्र धुक्याचा अजिबात मागमूस नाही. स्वच्छ लखलखीत. अगदी आत्ताच धुवून वाळत घातल्यासारखं. मस्त वाटलं. तिथेच रेंगाळलो. बराच उशीर पर्यंत तो निसर्ग, तो गाव, तो कळस, त्यामागचा तो सिंहगड आणि निळं आकाश, इतकंच न्याहाळत उभा राहिलो. भान विसरलो.

जाणारे येणारे कदाचित माझ्याकडे विचित्र नजरेने बघत गेले असतील पण मला त्याचं काहीच वाटत नव्हतं.
माझी बोजड बॅग उतरली आणि कॅमेरा काढला. पटापटा फोटो काढले जसं की काहीवेळाने हे सुंदर दृश्य बदलणार होतं. थोड्यावेळाने मार्गस्थ झालो. गावं हळूहळू मागे जात होती. दोन तीन सुकत चाललेले ओढे मागे गेले. दुष्काळाची तीव्र जाणीव झाली. शेती फारशी दिसत नव्हती. जी काही दिसत होती त्याला पाणी फारसं नव्हतंच. हिरवीगार शेती दिसणं मुश्किल होतं. पावसाळा संपून दीड महिना झालाय. आत्ताच अशी परिस्थिती, पुढे कसं होणार देव जाणे. पाबे बहुतेक पाठीमागे पडलं असावं. पुढे दोन्ही बाजूचे डोंगर एकमेकांचे हातात हात घालून उभे असलेले. या डोंगरांच्या शेवटी कदाचित वेल्हे असावं असं वाटलं पण तशी चिन्ह तरी दिसत नव्हती. मी एका चढाला थांबलो. सोबतची पाण्याची बाटली तोंडाला लावली व सुकलेल्या गळ्याला थोडं शांत केलं. एव्हाना सूर्य बऱ्यापैकी वर आला होता आणि गरमीपण वाढली होती. बरं झालं मी जॅकेट घेतलं नव्हतं नाहीतर खूप आधीच परतायचं ठरवलं असतं. आजूबाजूच्या टेकड्यांचं ते सोनेरी रुपडं न्याहाळलं. त्यावर कुठेकुठे हिरवं रान साज चढवल्यासारखं वाटत होतं.

दूरवरून सिंहगड माझ्यावर नजर ठेऊनच होता. शेताच्या बांधावर झेंडूच्या फुलांची रांग सिंहगडाला सजवत होती.

पाणी घेऊन जाणाऱ्या ताईंना मी वेल्हे किती दूर आहे असं विचारलं. ताई म्हणालो तरी त्या गोड लाजल्या आणि या डोंगराच्या पलीकडे आहे, घाट पार करून जावं लागेल, असं हातवारे करतच मला उत्तर मिळालं.
गाडीत पेट्रोल कमी असल्याचा अंदाज बांधला आणि आता पुढं न जाता पुन्हा जाऊ असं लगेच ठरवून परतीच्या मार्गावर लागलो. परतताना वाटलं आपल्याला मागे पण डोळे असते तर किती बरं झालं असतं! इतकं काही बघून सुद्धा खूप सारं बघितलंच नव्हतं. खरंतर, परतताना मी गाडीचा वेग थोडा वाढवतो. पण आता तो कमीच ठेऊन परतीचा मार्ग डोळ्याखालून घालत होतो. किती आणि काय काय बघू असं झालं. डावीकडच्या त्या निळ्या आभाळात एका विमानाने ओढलेली पांढरी रेघ अगदी उठून दिसत होती. तर उजवीकडे सिंहगडाच्या वर दोन छोट्या ढगांनी मस्तकी टिळा लावावा असं दिसत होतं. या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा किती मन प्रसन्न करून जातात, नाही का?

आधीचा घाट उतरताना समोरून सिंहगड त्या जंगलाच्या झाडीतून माझ्यावर लक्ष ठेऊन आहे की काय असं वाटलं. तसा त्याला कॅमेरा बंद केलाच. एखाद्या वाटेवरून परतताना असं काही मी अनुभवलं तर नक्कीच नव्हतं. संथ गतीने जाताना मात्र या गोष्टी नजरेत भरतात आणि चित्त प्रसन्न करून मनावर राज्य करतात. पुन्हा पुन्हा असा अनुभव यावा असंच वाटू लागतं.

रस्त्याच्या मधे येऊ घातलेल ते झाड जाताना नाही दिसलं पण येताना कळलं की त्या झाडाखाली काही देवांचा वास आहे. कदाचित जवळच्या गावातील लोकांनी त्यांची स्थापना केली असेल. एक चांगली गोष्ट मात्र त्यातून नकळत गावकाऱ्याकडून घडलीय. रात्रीच्या अंधारात गाडीच्या प्रकाशात ते शेंदूर लावलेले देव लक्ष वेधून घेत असतील व अपघाताचं प्रमाण नक्की कमी झालं असेल.
पोट रिकामं झाल्याची जाणीव झाली. एक वाजत आला होता. घाट संपण्याआधी उजवीकडे एक छोटं हॉटेल दिसलं. (नाव बघायचं विसरलो.) चहा तरी मिळतो का बघावं म्हणून तिथे गेलो. बाहेर लटकलेल्या काळ्या फळ्यावर लिहिलेल्या खाद्यपदार्थांची मोठी यादी बघितल्यावर वाटलं की इथेच जेवण करावं. पिठलं भाकरी खूप दिवसात चाखली नव्हती. तिखट, मध्यम की अळणी अशी विचारणा झाली. मध्यम, इति मी...पण आधी चहा द्या मग जेवण.
चहा घेऊन पिठलं भाकरीवर यतेच्छ ताव मारला. दोन भाकरी खाणारा मी, तिसरी भाकरी सुद्धा संपवली. दुसऱ्या वाटीचे वेगळे पैसे आम्ही घेत नाही असं हॉटेलच्या मालकाने सांगितले, तेंव्हा भरपूर जेवा, असा आग्रह गावाकडेच दिसू शकतो.
पिठलं भाकरी आणि कांदा. अगदी सुग्रास. ते देखील त्या जंगलातील थंड वातावरणात. मी पसंती दर्शवल्यावर मालक म्हणाले की ते दोघे नवरा बायकोच सगळं सांभाळतात. व्याप वाढवावा असा खटाटोप आहेच पण कामगार मिळत नसल्याने दोघांना झेपत नाही. तिकडे नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून लोकं आरडाओरड करतात आणि अशा ठिकाणी लांब पडतं म्हणून कामगार मिळत नाहीत. आश्चर्य आणि चीड, दोन्हीच्या मिश्रणातून मी मान डोलावली. दोन चहा आणि पिठलं भाकरी साठी त्यांनी फक्त पन्नास रुपये घेतले. हे जरा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारंच होतं. इतक्या कमी रुपयात पुण्यात तुम्ही यतेच्छ मिसळ पाव सुद्धा खाऊ शकत नाही. पुढच्या वेळी सकाळचा नास्ता सुद्धा इथेच करण्याचं मनोमन ठरवलं.
आता सुस्ती आली होती. तिथेच कुठल्यातरी झाडाखाली जाऊन मस्त झोप काढावी असं वाटलं. घरी परत जाणं भाग होतं. गाडीचा वेग थोडा वाढला. गाडीच्या आरश्यात मागचं दृश्य बघितलं, खूप मागच्या डोंगराच्या वरील निळ्या आकाशात स्वच्छ पांढरे कपडे परिधान करून आलेले ते ढग मला हात करून परत बोलवत होते.

3 comments:

  1. Replies
    1. धन्यवाद, काही सूचना कराव्या वाटल्या तर नक्की कळवा.

      Delete