Wednesday, February 3, 2016

वीर डॅम वरील फ्लेमिंगो

नवीन वर्षांचा आणि पाबे घाटातील सुर्यास्ताचा ब्लॉग तर लिहिला पण वीर डॅम च्या व्हिजिट बद्दल लिहायचंच राहून गेलं.
डिसेंबरच्या मधेच कधीतरी आशूला कुणाकडून तरी खबर मिळाली की त्यानं फेसबुकावर बघितलं की वीर डॅमवर फ्लेमिंगो आलेत. ज्या फ्लेमिंगोसाठी आम्ही १२० किमी भिगवणला गेलो होतो त्यातलेच काही अगदी ६० किमी वरच्या वीर डॅमवर आलेत. भिगवनचा अविस्मरणीय अनुभव डोळ्यासमोरून तरळून गेला. आमचं लगेचच ठरलं, रविवारी (२०-१२-२०१५) वीर डॅम वर. मी, आशू, विरेश आणि सत्या. यावेळी योगेशकडे पाहुणेमंडळी आलेली त्यामुळे तो येणार नव्हता. शनिवारी (१९-१२-२०१५) आशुबरोबर पाबे घाटातील सुर्योदयाचे फोटोशूटिंग झालं होतं. रात्री गप्पा मारतामारता म्हणजे आमच्या चौघांच्याच गप्पा सुरु होत्या. बाकीचे इंटेरेस्टेड नव्हते. कदाचित त्यांना पटलं नसावं. जायचंच असं ठरलं. मी आणि वीरू जर जाणार नसतो तर आशू आणि सत्या पाबे घाटात ग्रीन फुटेड पिजन म्हणजे पिवळ्या पायांचे हिरव्या कबुतरांच्या मागावर जाणार होते. सकाळी सहाला सिंहगड रोडवरील हायवे पुलाखाली भेटायचं ठरलं.
सकाळी घरातून निघताना मला फोन करा म्हणून मी सत्याला सांगितलेलं पण तो विसरला. आशूने चांदणी चौकात आल्यावर मला व विरुला मेसेज केले. आणि मी घरातून बाहेर पडेपर्यंत ते ठरलेल्या ठिकाणी पोचले पण. सकाळ गारठून गेलेली. थंडी वाढतच चाललेली. तसं अजून गारठा आहे म्हणू शकत नव्हतो पण हुडहुडी भरलीच. गाडी चालवता चालवता अंगात गरमी वाढावी म्हणून वेगवेगळे गाडीवरचे व्यायामाचे प्रकार सुरु केले. आणि थंडीमुळे नाचतच पोचलो. योग्य ठिकाणी गाडी पार्क करून आधी पूर्वेकडील गुलालाची उधळण करत असलेल्या आकाशाचे मोबाईलवरच फोटो काढले आणि आम्ही वीर कडे कूच केली. तरी सात वाजायला आले होते.
गाडीत आधी सत्याच्या नवीन कारच्या पार्टीची चर्चा. मग आशूने सांगितले की फ्लेमिंगो बघायला मिळतीलच याची ग्यारंटी कमीच. सगळेच भडकले. थोडा उद्धार झाला. पण आता माघार नाही. भूक लागलेली. त्यात आम्ही अशा ठिकाणी जाणार होतो की काहीही खायला प्यायला मिळणार नव्हतेच. पुणे - कोल्हापूर हायवे वर एके ठिकाणी चांगले पोहे आणि मिसळ मिळतात ते खाऊन पुन्हा मार्ग पकडला. दोन वेगवेगळ्या रस्त्याने वीर डॅम कडे जाता येतं. एक वीर गावातून जातो तर दुसरा वीर डॅमच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जातो. आम्ही गावातून न जाता दुसऱ्या बाजूला गेलो. आधीच कुणीतरी पक्षांच्या मागून गाडी नेत फ्लाईन्ग फोटोग्राफी करायचा प्रयत्न करत होतं. आशू भडकलाच. लांबूनच हातवारे करून थोडी बडबड सुरु केली. मग थोड्यावेळाने ती गाडी निघून गेली. आम्ही पाण्याजवळ गाडी नेऊन उभी केली आणि खाली उतरताच कळालं की आम्ही चिखलात आहोत. बुटाला चिखल चिटकून बसला. चालताना बूट थोडा पँटला खाली घासत होता आणि त्यामुळे पॅन्ट चिखलमय झाली. अजून फोटोग्राफीला सुरवात सुद्धा झालेली नव्हती. कॅमेराची बॅग पाठीवर लटकवल्या. आणि लगेच सत्याने डोक्याला हात लावला. तो कॅमेरातील कार्ड घरी विसरून आलेला होता. माझ्याकडे एक जी बी चं अजून एक कार्ड होतं ते त्याला दिलं पण फारसे फोटो काढणं शक्य नव्हतं. म्हणून वीरूने त्याचं कार्ड शेयर करायचं ठरवलं. लांबून आम्हाला फ्लेमिंगोची तीन पिल्लं दिसली.

आम्ही जवळ जायचा प्रयत्न केल्यावर लांबवर उडून गेले. फोटो काढले पण म्हणावे तसे चांगले काढू शकलो नव्हतो.


तिथेच काही रुडी शेल डक नावाच्या पिवळ्या तपकिरी रंगाच्या बदकाचा थवा उन्हं खात बसलेला.


सत्या आणि आशू त्या तीन फ्लेमिंगोच्या पिलांच्या मागे गेले. मी आणि वीरू या बदकांच्या मागे लागलो. उभ्या उभ्या चालत त्यांच्या दिशेने जायला लागलो पण ते सगळे बिथरून गेले होते. तो थवा तिथून उडून गेला.

मग लक्षात आलं की आम्ही उभ्याने चालत न जाता वाकून हळूहळू पुढे जायला हवं होतं. तिथेच थोडावेळ थांबल्यावर तो थवा पुन्हा आला आणि थोडा लांबवर विसावला. मग मी खालीच बसलो. वीरूला पण खाली बसायला खुणेनेच सांगितलं. खाली वाकून थोडं चालणं आणि परत बसणं, असं करत करत हळूहळू पुढे जात होतो. पण तरी देखील ते लांबलांब जातच होते. मी वळून बघितलं तर वीरूने चक्क लाल रंगाचा टी शर्ट घातलेला. त्यात त्याला वाकून चालणं जमत नव्हतं आणि फार वेळ खाली बसून सुद्धा पायाला त्रास होत होता. आता रांगत रांगत जाणं भाग होतं. आम्ही तसा प्रयत्नही केला. आणि बऱ्यापैकी जवळ जाण्यात यशस्वी झालो. काळ्या चोचीचा, पांढऱ्या डोक्याचा, सोनेरी तपकिरी रंगाचा, त्यातून काही डोकावणारी चमकदार हिरवी पीसं आणि काळ्या शेपटीचा असा हा सुंदर आणि मोहक पक्षी.


याला मराठीत ब्राम्हीणी बदक म्हणतात. हा पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून इथे भारतात किंवा दक्षिणी आशिया खंडात दक्षिणी युरोप किंवा मध्य आशिया खंडातून येतो. इतकं सगळं मी इतरत्र वाचून त्यातील काही भागच लिहितोय. उठल्यावर गुढग्यावर नजर गेली. दोन्हीबाजूच्या गुढग्यावर चिखलाचे दोन मोठे ठसे उमटलेले. या गोष्टींची सवय हळूहळू पडायला लागलीये.
मग आमचा मोर्चा पुन्हा फ्लेमिंगोकडे वळला. वीरू, सत्या जिकडे जाऊन बसला होता तिकडे गेला. मी दुसऱ्या बाजूने पुढे जात होतो. पण ते पुन्हा उडून लांब गेले. आज त्यांचा फोटो काढायला मिळेल असं वाटत नव्हतं. कोणत्या दिशेने गेलेत त्यावर मी लक्ष ठेऊन होतो. गाडी जिकडे लावलेली तिथून थोडं पुढे गेल्याचे दिसले. मग सगळेच उठलो आणि गाडीकडे परतलो. आधी पाणी पिणं मग थोडी मस्ती. उड्या मारतानाचे काढलेले फोटो.

इतकं होताना आजूबाजूला लक्ष गेलं. धरणाच्या पाण्यात गाड्या धुण्यावर बंदी असताना काही गावकरी मंडळींचं गाड्या धुणं चालूच होतं जसं की त्यांच्या ते गावी नव्हतंच. आशूचा तळतळाट होत होता. त्याला काय करावं कळत नव्हतं. आम्हाला वादाचे प्रसंग अजिबात नको होते. त्यामुळे वेळ जातोच पण साध्य काहीही होतं नाही. त्याने तरीही त्यांचे मोबाईलवर फोटो काढलेच. त्याचं तो काय करणार ते मात्र कळालं नाही. काही अंतरावर दोन तीन धोब्याचं मन लावून काम सुरु होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते तीनही फ्लेमिंगोची पिल्लाचं त्यांच्या अगदी जवळच काठावर पाण्यात उभे राहून खाणं चाललेलं.


मी सत्याला ते दाखवलं. त्याची प्रतिक्रिया तर अजून बुचकाळ्यात टाकणारी होती. तो म्हणाला की त्यांना माहिती आहे की त्या धोब्यांपासून त्यांना काहीही धोका नाही. आणि ते धोबी त्यांच्यामागे लागणारही नाहीत. आमच्यापासून मात्र ती पिल्लं दूर पळून जात होती. आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न केला पण तिथूनही ते उडून गेले.


जवळून फोटो घ्यायचा काहीतरी मार्ग काढणं आवश्यक होतं. ते ज्या दिशेने गेले तिकडे आम्ही गाडीतूनच गेलो. गाडी रस्त्यावर उभी करून त्या पिल्लांच्या दिशेने हळूहळू वाकत चालत जाऊ लागलो. वीरूला जॅकेट घालण्यास सांगितले पण उन्हामुळे प्रचंड गरमही होत होतं म्हणून त्यानं नाकारलं. तो आणि सत्या माझ्या उजव्या बाजूने जात होते. मी मधून आणि आशू डाव्याबाजूने जायला लागला. आम्ही वाकत चालत होतो. रांगत जाणं शक्यच नव्हतं. एकतर गळ्यात कॅमेरा. तो एका हातात धरून पुढे सरकत जाणं जमत नव्हतं. त्यात छोटे दगड गुढग्याला टोचत होते. खुज्या हिरवळीतून मात्र रांगतच जात होतो. खरंतर कुणीतरी असा आमचा फोटो काढायला हवा होता. जसजसं पुढे जात होतो तशी ती पिल्लं हळूहळू पुढे जात होती पण उडून जाणार नव्हती. मी एकदोन मीटर गेल्यावर थांबत होतो. आशू डावीकडे फार लांब गेला व तिकडून फ्लेमिंगोच्या दिशेने रांगतच येत होता. मी एका कोरडया जागी बसून राहिलो. आता आशू जसा इकडे येत होता तसे ती पिल्लं माझ्याकडे सरकायला लागली. माझं फोटो काढणं सुरूच होतं.



आशूला खुणेने अजून जवळ यायला सांगत होतो आणि त्याच वेळी सत्या मागून आम्हाला परत बोलवत होता. आशू आणि मी आमच्याजागी बसून राहिलो.
फ्लेमिंगो स्वतःभोवती फिरत नाच करत त्याचं खाणं करत असतात असं आम्हाला मागे भिगवणला गाईडने सांगितलेलं आठवलं आणि आज त्यांना तसं करताना प्रत्यक्षात पाहत होतो. स्वतः भोवती गोल फिरतात आणि काठावरील पाण्यातील गाळ नाचत हलकासा ढवळतात की त्या गाळात लपलेले किडे आणि छोटे मासे त्यातून बाहेर पडल्यावर अलगद टिपता यावेत. हा त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम. आशूने त्याचा केलेला व्हिडीओ आम्हाला परतताना दाखवली. मी तर आवाकच झालो. ही गोष्ट माझ्यासाठी नवीनच होती. अशा बऱ्याच गोष्टींचं आकलन व्हायला खरंच निरीक्षण करण्याची आवश्यकता असते.

(तो व्हिडीओ आशूने यु ट्यूब वर अपलोड केलाय. त्याची ही लिंक. जरूर बघा.
https://youtu.be/8ZMjorqPKmk )

सत्या सारखा बोलवतोय म्हणून आम्ही तिथून हुळुवार वाकत उठून परत चाललो, जेणेकरून फ्लेमिंगो जसे स्वतः मधे मग्न होते तसेच रहावेत हा आमचा प्रामाणिक उद्देश. सत्या म्हणाला," अरे हम ये तीन के ही पीछे पडे है। डॅम के दुसरे साईड में बहोत सारे है। वहीं चलेंगे।" असं म्हणून त्याने आम्हाला एक फोटो दाखवला. दुसऱ्या बाजूला फ्लेमिंगोंचा मोठ्ठा ग्रुप होता. आणि त्यांच्या जवळच एक फोटोग्राफर फोटो काढत होता. लगेच आम्ही गाडीतून तिकडे निघालो. एव्हाना सूर्य बराच वर आलेला. खूप गरम होत होतं. आमच्याकडंच पाणी कधीच संपून गेलं होतं. रस्त्यावरील एका घरासमोर थांबून त्यांच्याकडून दोन बाटल्या भरून घेतल्या. कारण या भागात हॉटेल नावाचा प्रकार कुठेही दिसत नव्हता. खेडेगाव लहान असल्याने हॉटेल असण्याची चिन्ह नव्हती. ते गाव मागे पडलं. दोन्ही बाजूला लांबपर्यंत पसरलेली हिरवीगार शेती त्या गावांची नैसर्गिक समृद्धी दाखवत डोलत उभी होती. अजिबात राखरखीतपणा वाटत नव्हता. डोळे थोडे शांत झाले. तो रस्ता सोडून आम्ही वीर गावाकडे वळालो. कोपऱ्यावरच्या छोटेखानी हॉटेलवर खाण्यापिण्याची सोय तरी होते का बघायला म्हणून आम्ही उतरलो. जे असेल ते खायचं ठरलं. भेळ मग भजी नंतर गरमागरम वडापाव आणि माझ्याकडचा चिवडा. प्रचंड भूक लागलेली. गप्पा मारता मारता किती खाल्लं कोण जाणे. थोडी तरतरी आली. चहाचे गरमागरम पाणी ढोसलं आणि निघालो. पुढे धरणातून कॅनॉल मधे पाणी जिथून सोडतात त्याठिकाणी आशू म्हणाला की किंगफिशर बघायला मिळतील. म्हणे त्याने तिथे पाहिलेले होते. म्हणून गाडी थोड्या सावलीत उभी करून आम्ही किंगफिशर चा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण काहीही दिसलं नाही. गाडीकडे परतताना, भला मोठा सुकलेला काटा सत्याच्या चपलेच्या तळातून आरपार घुसला. काटा काढून बघितलं तर पाय रक्ताने माखून गेला. मग नुकत्याच भरलेल्या एका बाटलीतील पाण्याने पाय धुवायला लावला व गाडीत बसलो. त्याचा पाय बहुदा खूप ठणकत होता. गाडी हळूहळू चालवत त्याने कशीबशी पुढे एका छोट्या हॉटेलपर्यंत नेली. आधी बर्फ़ाचा शेक मग हळद लावून भरपूर पाणी प्यायला लावलं. बहुदा ठणक थोडी कमी झाली असावी.
धरणाच्या कडेने जाताजाता सगळ्यांचंच लक्ष बाहेर पक्षांचा शोध घेत होतं. ऊन वाढलं की पक्षी गायब होतात. आम्हाला साधा कावळा सुद्धा दिसला नाही. धरणाची भिंत संपल्यावर एका ठिकाणी शेतातून एक पायवाट पाण्याकडे जाताना दिसली. गाडी झाडाखाली उभी करून पायवाटेवरची धूळ उडवत आम्ही चालत निघालो. आधी उसाची शेती ओलांडून पुढच्या खूप आधी कापणी झालेल्या शेतातून जाताना अचानक जमिनीवरून काही तपकिरी रंगाचे पक्षी कलकलाट करत उडून गेले. त्याचा रंग अगदी तांबड्या मातीसारखा असल्याने ते सहजासहजी नजरेस पडत नाहीत. पण अचानक कलकलाट करत उडून गेल्यामुळे छातीत धडकी भरते. काही कळायच्या आत खूप लांब जाऊन पोचतात. असा माझा हा दुसरा प्रसंग. मागे मी आणि सत्या हिंजेवाडी मागील छोट्या बंधाऱ्याकडे जाताना असाच प्रसंग अनुभवला होता. हे पक्षी झाडावर रहात नाहीत तर जमिनीवरच त्यांचं आयुष्य जातं. एकट्याने कधीच रहात नाहीत. घरटं बांधण्याच्या भानगडीत न पडता खुज्या झाडाझुडपात राहतात. त्यांचा रंग बुरुम मातीच्या रंगाशी इतका साम्य असतो की अगदी दोन चार फुटावर असले तरी सहजासहजी नजरेस पडत नाही.
मी आणि सत्या तेथील छोट्या माळरानावर हळूहळू चालत त्या पक्षांचा शोध घेत होतो. ज्याठिकाणी ते सगळे परत आले होते तिथे पोचलो. यावेळी कॅमेरा सज्ज होता. आधी वाटलं की इथून ते पुन्हा निघून गेले असतील म्हणून आम्ही परतणार तेवढ्यात तो कळप पुन्हा कलकलाट करत उडून खूप लांब गेला.


त्यांचा फोटो काढण्याचा मी शक्य तितका प्रयत्न केला. पण पुन्हा सेटिंग्ज नीट नसल्याने खूप खराब फोटो आले. बहुदा सत्याला चांगले फोटो काढता आले असावेत. आम्ही मागे राहिलो होतो. आशू आणि वीरू पुढे पाण्यापर्यंत जाऊन परत येत होते. फ्लेमिंगो काही दिसले नाहीत. कदाचित आम्ही चुकीच्या बाजूला आलो होतो. धरणाला येऊन मिळणाऱ्या नदीच्या दुसऱ्या तीरावर बहुदा फ्लेमिंगो असावेत. नदी पार करायला जागा नव्हती. दुपारच्या उन्हात हिंडून आमची एनर्जी संपली होती. एखादे उंच झाड तिथे असतं तर कदाचित आम्ही त्याच्या सावलीत अक्षरशः ताणून दिली असती. अगदी कसंबसं गाडीकडे परतलो आणि परतीचा मार्ग पकडला. सगळेच ढेपाळले होते. इतके की कॅमेरा बॅगेतून काढून फोटो बघावेत असं वाटलं नाही. आशूने फ्लेमिंगोचा विडिओ बघून सगळेच खुश झाले. घरी परतलो तेंव्हा घड्याळ संध्याकाळची साडेपाचची वेळ दाखवत होतं.

आणखी काही फोटो …










1 comment: